Ad will apear here
Next
भोगीच्या सणाचे महत्त्व आणि भोगीच्या खास पदार्थांच्या रेसिपीज
भोगीची भाजी (फोटो सौजन्य : मधुरा रेसिपीज)

मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी. भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे. या सणाचे महत्त्व आणि या सणानिमित्ताने केली जाणारी भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, तिळाची खिचडी आदी पदार्थांच्या रेसिपीज यांबद्दलचा हा लेख...  
........
 ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे. कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो; पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे! जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात! 

या दिवशी सकाळी आपले घर, तसेच घराभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्व जण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. 

भोगी साजरी का करावी?
या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धरतीवर उदंड पिके पिकावीत, म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती शेती वर्षानुवर्षे पिकत राहावी, अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळमिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन उबदार प्रेमाचा अनुभव घेतो. त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतो. 

मराठवाड्यात या भाजीला ‘खेंगट’ म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरुवात होते. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण ‘पोंगल’, आसाममध्ये ‘भोगली बिहू’, पंजाबमध्ये ‘लोहिरी’, राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या नव्या गोष्टी अंगीकारल्या जातात. नवा बदल केला जातो. म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची. या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे.

या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते; मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. म्हणजे तुम्ही वसई-पालघरकडे वाडवळांकडे जेवायला गेलात, तर त्यांची पद्धत एकदम भिन्न असलेली दिसते. किंबहुना त्यांची पद्धत उंधियुच्या एकदम जवळ जाणारी आहे आणि त्यांनी या भाजीला दिलेलं नावही भन्नाट आहे-उकडहंडी. 

भोगीची भाजी करायची अजून एक पद्धत आहे. ही पद्धत कोकणातल्या मासेखाऊंची आहे. भाज्या सगळ्या वरच्याच असल्या तरी, कोकणात केली जाणारी भोगीची भाजी ही भाजलेल्या कांद्या-खोबऱ्याचं वाटण लावून केली जाते. थेट मटणासाठी वापरला जाणारा मसालाच या भाजीसाठी वापरत असल्यामुळे घरात मटण शिजत असल्याचाचा भास होतो; पण प्रत्यक्षात चिकन-मटण नसलं तरी काही फरक पडत नाही. कोकणी घरात शिजलेली ही भोगीची भाजीच इतकी फर्मास असते की, त्यापुढे चिकन-मटणही फिके पडेल.

भोगीची चारोळी 
भोगी सण आनंद उपभोगाचे तत्त्व 
सवाष्ण महिलेचे पुजिले जावे सत्त्व
भोगी सण सांगे नारीशक्तीचे ममत्व
सवाष्णीला दिलेल्या दानाचे महत्त्व!

भोगीची भाजी (फोटो सौजन्य : चकली डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम)

भोगीची भाजी 
साहित्य : तीन-चार प्रकारच्या पापडी शेंगा व त्यांचे दाणे, छोटी वांगी, बटाटे, गाजर, मेथी, बेसन, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, धणे-जिरे पूड, काळा गोडा मसाला, हळद, मोहरी, हिंग, गूळ, अर्धी वाटी तीळ, नारळाच्या अर्ध्या वाटीचे खोबरे, कढीपत्त्याची दहा-बारा पाने, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, तीन-चार हिरव्या मिरच्या आणि तेल. 

कृती : मेथीची भाजी धुऊन घेऊन बारीक चिरावी. त्यात तिखट, मीठ, तीळ, धणे-जिरे पावडर, हळद आणि एक चमचा तेल घालावे. हे सगळं भाजीला व्यवस्थित लावल्यावर भाजीला पाणी सुटेल. त्या पाण्यात मावेल इतकेच बेसन घालून त्याचा घट्ट गोळा तयार करावा. दीड ते दोन इंच लांबट आकाराचे मुटके तयार करून पॅनमध्ये तेल घालून सर्व बाजूंनी मंदाग्नीवर शिजवून घ्यावेत.

गाजर व बटाटे यांची साले काढून त्यांच्या वेगवेगळ्या आकाराच्या फोडी कराव्यात. शेंगा सोलून त्याचे दाणे व सालेही घ्यावीत. एका वांग्याच्या दोनच फोडी कराव्यात. सर्व भाज्या स्वच्छ धुऊन निथळत ठेवाव्यात. तेल व फोडणीचे सामान सोडून वरील सर्व मसाल्याचे घटक पदार्थ मिक्सरमधून चांगले बारीक वाटून घ्यावेत. कढईत नेहमीपेक्षा जास्त तेल घालून मोहरी, हळद, हिंगाची फोडणी तयार करावी. त्यावर निथळत ठेवलेल्या भाज्या घालून, परतून, झाकून पाच मिनिटे मंदाग्नीवर ठेवावे. वाटलेल्या मसाल्याचा गोळा घालून त्या गोळ्यात भाजी चांगली परतून घ्यावी. भाजीला जितका रस्सा हवा असेल त्या बेताने गरम पाणी घालावे, थोडा गुळाचा खडा घालून भाजी पाणी आटेपर्यंत मंदाग्नीवर शिजवावी. भाजी उतरवण्यापूर्वी पाच ते सात मिनिटे अगोदर बनवून ठेवलेले मेथीचे मुटके त्यात घालावेत. भाजी हलवताना मुटके मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते. 

बाजरीची भाकरी (फोटो सौजन्य : कोकणकन्या फेसबुक पेज)

बाजरीची भाकरी
साहित्य : बाजरीचे पीठ, मीठ, पांढरे तीळ

कृती : बाजरीचे पीठ व मीठ एकत्र करून पीठ भिजवावे. त्याची भाकरी थापून तव्यावर टाकावी. जरा गरम झाली, की पाणी फिरवावे. पाणी सुकले की भाकरी उलटावी. थोड्या वेळाने उलथणे फिरवून पाहावे. भाकरी तव्यावरून सुटली, की तवा उतरवून गॅसवर शेकावी. छान पदर सुटेल. ही भाकरी पांढरे तीळ लावूनही करता येते.

तिळाची खिचडी 
साहित्य : अर्धा कप तांदूळ, पाव वाटी मुगाची डाळ अर्धा तास भिजवून, पाव कप तीळ, तूप, कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिंग, हळद, काळे मीठ, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर, खोबरे, तूप. 

कृती : पाव कप तीळ भाजून घ्या. कढईत तीन-चार चमचे तूप तापवून त्यात फोडणी करा. नंतर त्यात डाळ, तांदूळ व तीळ घालून चांगले परता. त्यात दोन कप पाणी घालून शिजायला ठेवा. शिजताना त्यात काळे मीठ, एक-दोन अख्ख्या हिरव्या मिरच्या व पाव इंच आल्याचे तुकडे घाला. खिचडी झाल्यावर वरून कोथिंबीर, खोबरे भुरभुरा. गरम असतानाच तूप घालून सर्व्ह करा. 

(माहिती संकलन : संजीव वेलणकर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MVBXCU
Similar Posts
भोगीच्या सणाचे महत्त्व आणि भोगीच्या खास पदार्थांच्या रेसिपीज मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी. भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे. या सणाचे महत्त्व आणि या सणानिमित्ताने केली जाणारी भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, तिळाची खिचडी आदी पदार्थांच्या रेसिपीज यांबद्दलचा हा लेख...
केक का बिघडतो? आजकाल दुकानात केकचे अनेक प्रकार असतात. आपण गोंधळून जाऊ इतकी सुंदर सजावट असते. वेगवेगळे आकर्षक साहित्य, चव, एखादी थीम डोळ्यापुढे ठेवूनही केकची ऑर्डर दिलेली असते, पण या सगळ्यांत कौतुक वाटते, ते घरी केक बनवणाऱ्या गृहिणींचे. मागील लेखात आपण केकसाठी लागणाऱ्या साहित्याचे महत्त्व आणि कार्य तसेच त्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या प्रमाणाचे महत्त्व पाहिले
भाज्यांचे रोल्स विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. परंतु पोळीसोबत भाजी मुलांच्या गळी उतरवणं एक अवघड काम आहे. अशा वेळी या भाज्या मुले खातील याप्रमाणे वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याकडे आईचा कल असतो. अशाच एका विविध भाज्या असलेल्या पदार्थाची रेसिपी आपण या वेळी पाहणार आहोत.... तो पदार्थ म्हणजे भाज्यांचे रोल्स
Can Healthy Food Be Delicious? I went to Living Light Culinary Institute to learn how to make healthy food delicious. There I learnt knife skills, food combining, flavour balancing and how to make delicious raw vegan recipes only using whole, fresh ingredients straight from Mother Nature. No sugar, no wheat, no dairy. To top it off,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language